तुकडोजी महाराज भजन // प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ?
प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ? प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ? ।।धृ0।। कुणाला भाग्य देवोनी, बसविले मंचकावरती । कुणी किति कष्ट जरि केले, तरी राहतात उपवासी ।।१।। कुणाला झोपडी नाही, रहाया तिळभरी कोठे । तया मुल-बाळ बहु देशी, मजा बहु लांबुनी बघशी ।।२।। कुणी करताति नवसाला, करोडो द्रव्य देवोनी । न देशी पुत्र एखादा, असा का भेद तुजपाशी ?।।३।। कुठे हे दे, कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला । सुखास्तव झूरती सारे, कळेना मार्ग कोणासी ।।४।। म्हणे तुकड्या तुझी लीला, पहाता वेद मौनावे । दीन अम्हि काय सांगावे, तुझी माया असे कैसी?।।५।।